विधानसभा मतमोजणी साठी प्रशासन सज्ज. मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबल - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 23, 2019

विधानसभा मतमोजणी साठी प्रशासन सज्ज. मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबल




औरंगाबाद, दिनांक 23 - जिल्हयातील नऊ मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 21 ऑक्टोंबर रोजी मतदान झाले. मतमोजणी उद्या, गुरूवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहेत. मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरवात होईल. मतदार केंद्राच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक फेऱ्या सिल्लोड विधानसभा मतदार संघात होतील.
 प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. फेरीनिहाय निकाल निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करतील. सर्वात शेवटी मतदार केंद्राच्या सर्व चिठ्ठ्या एकत्रित करण्यात येतील. त्यातून निघालेल्या पाच चिठ्ठ्यांनुसार पाच मतदान केंद्राच्या क्रमांकाच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करून खात्री करण्यात येईल.  अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीसाठी प्रती टेबलवर एक मतमोजणी अधीक्षक व सहायक,  एक सुक्ष्म निरीक्षक असे तिघेजण असतील. अधिकारी, कर्मचारी आदींसह संगणक, मतमोजणी ऑपरेटर यांचाही समावेश असणार आहे, असे एकूण जवळपास एक हजार अधिकारी- कर्मचारी मतमोजणीचे कामकाज पाहतील. 
सिल्लोड विधानसभा मतदार संघांची मतमोजणी शासकीय टेक्निजकल शाळा, सिल्लोड, कन्नड येथे शिवाजी महाविद्यालय, इंडोअर स्टेडिअम, फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्ये सिपेट इमारत, विमानतळाजवळ, औरंगाबाद, औरंगाबाद मध्यचे शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, औरंगाबाद पश्चिममध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, औरंगाबाद, औरंगाबाद पूर्वचे होमगार्ड कार्यालय (औरंगाबाद शहर), एन 12, हडको, औरंगाबाद, पैठण विधानसभा क्षेत्रचे प्रशासकीय इमारत, संतपीठ, उद्यान रस्ता, पैठण, गंगापूर विधानसभा क्षेत्राचे मुक्तानंद महाविद्यालय, इंडोअर स्टेडीयम, गंगापूर आणि वैजापूर येथे विनायकराव पाटील महाविद्यालय, सभागृह क्रमांक 1, येवला रस्ता, वैजापूर याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
*पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त*
शहरी क्षेत्रात चार मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राचा समावेश असून  150 अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. यामध्ये SRPF आणि RPF च्या दोन पथकांचा समावेश आहे.
औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी, केंद्रीय व राज्य सशस्त्र पोलिस बलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी 300 ते 400 पोलिस अधिकारी व कर्मचारी व सशस्त्र पोलिस बलाचे जवान यांचा चोख बंदोबस्त आहे. सर्व पोलिस वाहनांना व मतमोजणीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच प्रत्येक पॉईंटवर हजर असलेल्या व्हीडिओग्राफरकडून घडणाऱ्या प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण करण्यात येऊन बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये कोणीही गैरप्रकार करताना आढळल्यास या चित्रीकरणाचा पुरावा म्हणून प्रभावीपणे वापर केला जाईल.
  मतमोजणीचे दिवशी ज्यांचेकडून सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नि निर्माण केला जाण्याची शक्यता आहे अशा प्रत्येक इसमावर पोलिस व गोपनीय यंत्रणेची बारकाईने नजर आहे. अशा इसमाकडून  सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचे दुरोगामी परिणाम पुढील काळापर्यंत दिसत राहतील. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-  2019 च्या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेदरम्यान शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे पोलिस प्रशानातर्फे कळविण्यात आलेले आहे. 

No comments:

Post a Comment