पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत २०२०-२१ या वर्षात खरीप हंगामात मंजूर झालेल्या पिक विम्यापैकी केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच परताव्याची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे अजुन तालुक्यात पन्नास टक्के शेतकरी अद्याप पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. राज्य सरकारचा वाटा न मिळाल्याने विम्याची रक्कम सर्व लाभधारक शेतकऱ्यांना वाटप करता आली नाही अशी माहिती समोर आली आहे. वैजापूर तालुक्यात २०२०-२१ या वर्षात २ लाख २८ हजार ८७१ शेतकऱ्यांनी ८५ हजार २०५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगामातील पिकांचा विमा भरला होता.त्यात कापूस,मका,मुग,तुर,कांदा,बाजरी,सोयाबीन या पिकांचा विमा भरला होता.त्यापैकी कांदा व कापूस पिकाला विमा मंजूर झाला.५३ हजार ७३८ शेतकऱ्यांनी २०हजार २९९ हेक्टर वरील कापसाचा विमा भरला होता.तर ३ हजार ३६८ शेतकऱ्यांनी ७६४ हेक्टर वरील कांदा पिकांचा विमा भरला होता.एकूण ७२ हजार ३०५ शेतकऱ्यांना १६ कोटी दोन लाख ८२ हजार ३७५ रूपये विमा मंजूर झाला.त्यात टोल फ्री क्रमांकावर तक्रार करून विमा मिळालेल्या ७ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
विमा रक्कम मंजूर झाल्यानंतर राज्य शासन व केंद्र शासनाचा प्रत्येकी ४९ टक्के शेतकऱ्यांचा दोन टक्के हिस्सा भरला जातो.मात्र राज्य शासनाचा ४९ टक्के हिस्सा अद्याप जमा झालेला नाही.त्यामुळे केवळ ५० टक्के शेतकऱ्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची माहिती कृषी व पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतीवृष्टीने नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पिक विमा कंपनीच्या जाचक अटी व शर्ती मुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी विम्या पासून वंचीत राहीले आहे.तसेच राज्य शासनाच्या मंजूर केलेल्या आर्थिक मदती पासूनही अनेक शेतकरी वंचीत असून ते तहसिल कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.पर्जन्य वृष्टी झाल्यापासून ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीला माहीती कळवणे, नुकसान झालेल्या पिकांचे लोकेशनच्या सहाय्याने फोटो पाठविणे,पिकात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित लिंकवर अपलोड करणे आदी जाचक अटी लादल्या आहेत.तसेच गेल्या वर्षी विमा कंपनी कडे तक्रार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.कोणत्या नियमातून पिक विमा मंजूर होतो. हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.
३१ दिवसांपासून आंदोलन
२०२०-२०२१ या वर्षात १०० टक्के नुकसान होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे विमा कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय जन शक्ती संघटनेच्या वतीने ३१ दिवसांपासून तहसिल कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली प्रविण खाजेकर,शकील शेख,अल्ताफ बाबा,मोजम शेख,जाकेर पठाण, निवृत्ती सोनवणे हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलन यशस्वी न झाल्यास राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती खाजेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment