मागील सहा महिन्यांपासून वैजापूर शहरातील प्रत्येक वार्ड व प्रभागांमध्ये नगरपालिकेकडून नियमितपणे स्वच्छता होत नसून तसेच घंटागाडी द्वारे कचरा उचलला जात नसल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शहरातून जाणाऱ्या मुख्य स्टेशन रस्ता परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रवेशद्वारा जवळच तसेच पादचारी मार्गावर केरकचरा तसाच पडून राहत असल्याचे चित्र आहे. याशिवाय ठीकठिकाणी सार्वजनिक जागेवर कचरा पडून असल्याने तेथे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरात तातडीने स्वच्छता अभियान राबवून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ नगरपालिकेने त्वरित थांबावावा. अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख तथा युवा सेना प्रसिद्धीप्रमुख आवेजखान यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांची त्यांना निवेदन दिले.
शहरातील प्रत्येक वार्ड व प्रभागातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांची कुठल्याही प्रकारे स्वच्छता केली गेली नाही. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छताग्रहाची देखील स्वच्छता केली जात नसल्याने नागरिक हैराण आहेत. परिणामी, सर्वसामान्य नागरिक बालके व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतानाही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे कारण याबाबत वारंवार सूचना देऊनही पालिका प्रशासनाकडून कुठलेही ठूस पावले उचलले जात नसल्याचे खान यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा करणाऱ्या खांबावरचा वीजपुरवठा बंद असल्याने तेथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून महिला व मुलींसाठी ये जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे तेथील वीज पुरवठा सुरू करावा असे खान यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment